सोलापूर,दि.10: सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी सोलापूर शहर उत्तरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीचा गैरवापर केल्याचा आरोप नागणसुरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीचा गैरवापर करून बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून सवर्ण वस्तीमध्ये निधी खर्च करून मागासवर्गीय बंधू भगिनीं रहात असलेल्या भागावर अन्याय केल्याबाबत मी या शहरातला व शहर उत्तर मधील एक सजग नागरिक म्हणून प्रथमतः जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केलेला होता. परंतु सत्तेतील आमदार असल्यामुळे प्रशासनाकडून उचित कारवाई होण्याबाबत सुतराम शक्यता नसल्यामुळे उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे दिनांक 01.10.2024 रोजी जनहित याचिका दाखल केली आहे, असे जयराज नागणसुरे यांनी सांगितले.
नागणसुरे यांनी अधिकची माहिती पुढील प्रमाणे दिली. शासनाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना साधारणपणे 2002 पासून कार्यान्वित असून त्या माध्यमातून बहुतांश दलित वस्ती असणाऱ्या प्रभागांमध्ये विशेष घटक म्हणून शासनाने विशेष निधीची तरतूद करून त्यातून दलित वस्तीचा विकास करण्याचे योजलेले आहे. सदर तरतुदी आजतागायत कायम असून शासनाकडून अशा प्रकारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सदर योजनेमध्ये वस्ती सुधारण्यासाठी त्यामध्ये प्रामुख्याने गटारी पाण्याची सोय पथदिवे व रस्ते यासाठी निधी तरतूद केलेली आहे.
शहर उत्तरचे स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतःच्या आमदारकीचा गैरवापर करून स्थानिक सोलापूर महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून किंवा त्यांच्याशी संगणमत करून सदर योजनेअंतर्गत संपूर्ण सवर्ण वस्तीमध्ये योजनेच्या तरतुदीस हरताळ फासून कामे सुचवलेले आहेत. सदरची कामे व निधी हा पूर्णपणे दलित वस्त्या गलिच्छ वस्त्या यांच्या विकासासाठी आहे. असे नागणसुरे यांनी सांगितले.
पुढे नागणसुरे म्हणाले, परंतु शहर उत्तरच्या स्थानिक आमदारांनी दलितांच्या हक्काच्या पैशावर नांगर फिरवून त्याचा उपयोग स्वतःच्या पारंपारिक मतांसाठी केला असल्याचे दिसून येते. उदाहरणा दाखल शेळगी भागातील कन्नीनगर येथे 90 टक्के सवर्ण लोक असतानाही त्या ठिकाणी या योजनेतील निधी खर्च झालेला आहे व तो स्थानिक आमदारांच्या शिफारसी वरून खर्च झालेला आहे. तेथे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून यांचेच सुपुत्र डॉक्टर किरण देशमुख प्रतिनिधित्व करतात त्यामुळे मुलाला व स्वतःला फायदा होण्यासाठी दलित वस्तीचा पैसा वापरला गेलेला आहे. असा गंभीर आरोप नागणसुरे यांनी केला.
अशाच प्रकारे जवळपास साडेतीन कोटीची पिण्याच्या पाण्याचे योजना भवानी वॉटर वर्क्स ते एकबोटे फर्निचर हिप्परगा पर्यंत दुहेरी पाईपलाईन मंजूर करून घेतलेली आहे. सदर कामाचे वर्क ऑर्डर देखील निघालेली असून सदर संपूर्ण निधी हा दलित वस्ती सुधारण्याचा निधी आहे. विशेष म्हणजे सदरची पाईपलाईन जिथपर्यंत मंजूर झालेली आहे, त्या जवळपास याच आमदार महोदयांनी स्वतःच्या तसेच त्यांच्या मुलाच्या व अत्यंत जवळच्या नातेवाईकांच्या नावे जमिनी खरेदी करून ठेवलेले आहेत. त्यामुळे दलित वस्ती सुधारण्याच्या नावाखाली वेगळ्याच वस्त्या निर्माण केल्या जात आहेत. असा आरोप नागणसुरे यांनी केला.
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने मागील सहा ते सात वर्षांमध्ये नगरसेवकांच्या निधीमधून जी कामे करून घेतलेली आहे, त्याच ठिकाणी नगरोत्थान योजनेचा निधी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा निधी यांचा विनयोग दर्शवून बोगस बिले काढण्यात आलेले आहेत. असा गंभीर आरोप जयराज नागणसुरे यांनी केला आहे.
काही नगरसेवक व त्यांचे नातेवाईक मक्तेदार आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10 पालिका सदस्य होण्यास अनर्हता मधील कलम 1 मधील “फ ” पोट कलम (2) च्या तरतुदी नुसार अधिन तिचा महापालिकेबरोबर महापालिकेने किंवा महापालिकेच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात किंवा महापालिकेच्या नोकरीस तिचा स्वतः किंवा तिचा भागीदाराचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही भाग किंवा हित संबंध असेल तर या कलमान्वये नगरसेवक पदावर राहता येणार नाही व यापुढे 6 वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, अशा 10 नगरसेवकावर वरील कारवाई करण्याची उच्च न्यायालयात मागणी केली आहे. असे नागणसुरे म्हणाले.
सदरचे बाब अत्यंत गंभीर असून या सर्व बाबींचे उच्चस्तरीय चौकशी होऊन मिळण्यासाठी जनहित याचिका एक सुजाण नागरिक म्हणून दाखल केलेली आहे. माझा न्यायालयीन कामकाजावर विश्वास असून माझ्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेमध्ये मी संबंधित महानगरपालिकेचे कर्मचारी कंत्राटदार व स्थानिक आमदार यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केलेली आहे. असे नागणसुरे यांनी सांगितले.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.
Disclaimer: Solapur Varta Does Not Guarantee The Truth Of The Claim Made By Jairaj Naganasure.