शिर्डी,दि.21: सरकार तुमचं आणि आरोप भाजपवर या चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशी टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर (MVA) केली आहे. एसटी कामगारांच्या संपावरून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केबलचं कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम अनिल परब यांना सोप्प वाटतं का?, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही टीका केली. अनिल परब याना मुंबईत केबल कनेक्शन दिल्यासारख एसटीचं काम सोप वाटत का? परब यांनी कधी एसटीमधून प्रवास केलाय का? कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, कुटुंबाचा आक्रोश पाहिल्यावर मंत्र्यांच्या आरत्या ओवाळायाच्या का? असे सवाल करतानाच सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करतोस असं विखे-पाटील म्हणाले.
पवारांना टोला
एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. परिवहन मंत्री मीडियासमोर येऊन रोज बोलत आहेत. पण त्याला कोणताच आधार नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली असती, असं सांगतानाच राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची पाठराखण करायला वेळ आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्याना वेळ मिळत नाही ही राज्याची शोकांतिका आहे, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांचं नाव न घेता लगावला.
सरकार तुमचं आणि आरोप भाजपवर. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानावर का गेला नाही? असा सवाल करतानाच तुम्ही स्वतःला काँग्रेसी नेता समजतात ना? मग बैठक बोलवा व निर्णय घ्या, असं आव्हानच त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिलं.
या सरकारला दोन वर्ष झाली आहेत. या सरकारचा किमान समान कार्यक्रम म्हणजे वसुलीचा कार्यक्रम आहे. रोज मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. यांना जनाधार मिळाला नव्हता. मात्र वसुली करण्यासाठी यांचा समान किमान कार्यक्रम सुरू आहे. हे सरकार लोकांच्या केलेल्या फसवणुकीमुळेच पडेल, असंही ते म्हणाले.
केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यावर राज्य सरकार त्यांचे कायदे मागे घेणार अस समजलं. तुमचे कायदे केंद्रापेक्षा सक्षम होते तर मागे का घेताय? लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी कायदे आणले होते का? तुम्ही जर राज्याचे कायदे मागे घेणार असाल तर तुम्हाला आधी राज्याची माफी मागावी लागेल, असंही ते म्हणाले.