मुंबई,दि.27: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्याला अॅाफर दिली आहे. याचबरोबर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीलाही वंचितबरोबर येण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहेत. तर मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासाठी आग्रही आहेत.
राज्यात आरक्षणावरून वातावरण तापले असताना प्रकाश आंबेडकरही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहेत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये, स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. आम्ही सत्तेत आल्यास त्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे.
“भुजबळ यांनी आमच्याबरोबर यावं”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. “छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर यावं असं आम्हाला वाटतं”, असंही आंबेडकर म्हणाले. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. तर प्रकाश आंबेडकर देखील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशातच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीलाही वंचितबरोबर येण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष चालू आहे. अशातच प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं चित्र आहे. यात त्यांनी माकपला त्यांच्याबरोबर येण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी मागील निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर युती करून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणुकीत त्यांना फारसं यश मिळालं नाही. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकर पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.