सोलापूर,दि.2: देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन पंढरपूरात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. दोन वेळा स्वबळावर भाजपाने सत्ता स्थापन केली होती. मात्र यावेळी मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे लागले. यामुळे छोट्या पक्षांना जास्त महत्त्व प्राप्त झाले.
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर देशात भाजपाने सरकार बनवलं. त्यामुळे अर्थसंकल्पातही आंध्र प्रदेश आणि बिहार यांना मोठ्या प्रमाणात निधी देत भाजपाने खुश करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं. त्यातच बिहारला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने नितीश कुमार यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. एका काँग्रेस आमदाराने लवकरच नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत येतील असा दावा केला आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होण्यास एक महिना होत नाही तेवढ्यात दिल्लीतील राजकारणात येत्या महिन्याभरात मोठ्या उलाढाली होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे एनडीएतील घटक असलेल्या जेडीएसनंही भाजपापासून काही अंतर ठेवले आहे.
कर्नाटकात एनडीएकडून येत्या 3 ऑगस्टपासून तिथल्या सिद्धरमैय्या सरकारविरोधात पदयात्रा काढण्यात येणार आहे. मात्र भाजपाच्या या पदयात्रेत आमचा पक्ष सहभागी होणार नाही अशी घोषणा जेडीएस प्रमुख कुमारस्वामी यांनी केली आहे. जेडीएसच्या या पवित्र्यामुळे ते भाजपासोबत नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली.
देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना याबाबत माहिती दिली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. आपल्या शरद पवार यांच्याकडूनच याबाबत माहिती मिळाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
पंढरपूर इथल्या शेकापच्या अधिवेशनात जयंत पाटील म्हणाले की, या देशाचे नेते शरद पवारसाहेब या कार्यक्रमाला येणार होते. परवा त्यांनी मला फोन केला. दिल्लीमध्ये आहे, पुढील महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल होतेय. त्यामुळे मला माफ करा, मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही तेव्हा मी म्हटलं, सरकार पाडा आणि या, महाराष्ट्रात स्वागत करतो असं विधान त्यांनी भाषणात केले.