सोलापूर,दि.१८: एका – अकरा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म. नौशाद म. शमशाद अब्बासी याला दहा वर्षांचा कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी ठोठावली.
पीडित मुलगा हा धार्मिक पुस्तके वाचण्याच्या शिकवणीसाठी आरोपीकडे गेला होता. आरोपीने त्याला पुस्तक शोधायला लावण्याचा वहाणा करून खोलीमध्ये थांबवून घेवून दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तसेच ही वाव कोणाला सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन हाकलून दिले.
त्यानंतर फिर्यादीने आरोपीविरुध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद भा.दं.वि. कलम ३७७, ५०६ व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कलम ४ अन्वये गुन्हा नोंद झाला. फौजदार विक्रांत हिंगे यांनी तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. यात सरकारपक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यापैकी पीडित मुलगा, फिर्यादी, डॉक्टर व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयापुढे सरकारपक्षातर्फे आलेला पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला १० वर्षांची शिक्षा व सात हजार रुपये दंड न्यायाधीशांनी ठोठावला. यात सरकारतर्फे ॲड. शैलजा क्यातम, ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोवडे यांनी काम पाहिले. तपासीक अंमलदार विक्रांत हिंगे व कोर्ट पैरवी ए. एस.आय. विजय जाधव यांनी काम पाहिले.