मुंबई,दि.21: शिवसेना (शिंदे गट) नेते गजानन कीर्तिकर यांनी ईडीची चौकशी सुरू झाल्यामुळे रवींद्र वायकर यांनी पक्ष बदलला असे म्हटले आहे. रवींद्र वायकर यांना शिंदे गटाने मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. रवींद्र वायकर यांनी लोकसभेची उमेदवारी घेऊन अटक टाळली, असा दावा शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.
शिंदे गटात वायकर हे महिना-दोन महिन्यांपूर्वीचे प्रॉडक्ट आहे. मला जमेल तेवढा प्रचार मी केला. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील लढत ही अटीतटीची होईल, असे चित्र असल्याचे कीर्तिकर म्हणाले. ईडीची चौकशी सुरू झाल्यामुळे पक्ष बदलला, असं वायकर यांनी स्वतःच सांगितले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात मला ई-समरी द्या, मग मी उमेदवारी घेईन, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांची अटक टळली आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाची असलेली टांगती तलवार टळली, असे गजानन कीर्तिकर म्हणाले.
ईडीबद्दल आता लोकांमध्ये संताप आहे. ईडीबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या वरिष्ठांच्याही लक्षात आली असून पुढील काळात ते या कारवाया कमी करतील, असेही गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.








