महाराष्ट्रात उष्णतेची लाट; सोलापुरात उच्चांकी तापमान

0

सोलापूर,दि.५: सोलापूरसह राज्यात अनेक शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सोलापुरात काल ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाल्याने रात्रीचाही उकाडा जाणवत आहे. त्यात पुढील १५ दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या हंगामात तापमान स्वतःचेच उच्चांक मोडत असून गुरुवारी शहरात ४२.४ अंश सेल्सिअस इतक्या यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सोलापुरातील तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे शहरवासियांना सूर्यनारायणाची होरपळ सहन करावी लागत आहे.

सकाळपासूनच उन्हाच्या तप्त झळांमुळे आबालवृध्दांसह सर्वजणच हैराण होत आहेत. दुपारच्यावेळी तर अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी अनेकजण बाहेर पडणे टाळत आहेत. घरात बसूनही पंखा, कूलर, एअर कंडिशनरची हवा देखील गरम लागत आहे. त्यामुळे घरातही अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

वाढत्या तापमानामुळे दुपारच्यावेळी गजबजलेले रस्तेही निर्मनुष्य असल्याचे चित्र शहरात दिसून येते. जणूकाही अघोषित संचारबंदीसदृश स्थिती पाहावयास मिळत आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोप्या, छत्री, स्कार्फ, गमजे, रुमाल आदींचा वापर करताना दिसून येतात. उन्हामुळे घसा कोरडा पडत असल्याने शितपेयांच्या दुकानात व गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुधवारी शहरातील यंदाचे उच्चांकी तापमान ४२.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी तापमानाने आपला उच्चांक मोडत पारा ४२.४ अंशावर पोहोचला आहे.

गेल्या दोन दिवसात विदर्भामध्ये तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअस, ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पावसाची शक्यता आहे. ७ एप्रिलला मध्य महाराष्ट्रात आणि ७ एप्रिलला विदर्भात ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुण्यात पुढील सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील ९ तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी पण आपल्या चाळीसच्यावर आकडे जाताना दिसत आहेत. येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेकजण ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोक कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळी १२ ते दुपार ३ पर्यंत अतिमहत्त्वाचे काम नसेल तर बाहेर पडू नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील. पुढील पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नसून, पाच ते नऊ एप्रिल मध्य महाराष्ट्रात ८ एप्रिल मराठवाड्यात ६ ते ९ एप्रिल विदर्भात, ९ एप्रिल कोकण गोव्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

७ एप्रिलला मध्य महाराष्ट्रात आणि ७ एप्रिलला विदर्भात ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुण्यात पुढील सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील ९ तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here