नवी दिल्ली,दि.9: भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी काल (दि.8) महायुतीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती एकत्र निवडणूक लढणार आहे. महायुतीच्या जागावाटपात बराच पेच निर्माण झाला आहे. भाजपाला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात लढवायच्या आहेत तर एकनाथ शिंदे-अजित पवार हे देखील जागांवरील दावा सोडायला तयार नाहीत.
अशातच शिंदे-फडणवीस-अजितदादा यांना दिल्लीत बैठकीला बोलावण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्या निवासस्थानी या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० हून अधिक जागा भाजपा लढवणार आहे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६-८ जागा देण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईची जागा शिवसेना भाजपाला सोडण्यास तयार आहे. एनडीएने महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. रात्री १ च्या सुमारात हे तिन्ही नेते शाह यांच्या बंगल्यातून बाहेर पडताना दिसले. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती.
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचा समावेश आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. महाराष्ट्रात युतीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत शिवसेनेच्या २-३ जागांची अदलाबदल करण्याची सूचना शाह यांनी दिली आहे. काही उमेदवारांचीही अदलाबदल होऊ शकते.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे एकाच विमानातून मुंबईकडे आले. तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे एकाच विमानाने नागपूरला रवाना झाले.