कासगंज,दि.24: उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली. या अपघातात 7 लहान मुले आणि 8 महिलांसह 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात पडली. या अपघातात मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागला आहे.
सीएम योगी यांनी कासगंजमधील रस्ता अपघातावर शोक व्यक्त केला आहे, त्यासोबतच त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी सर्व जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ट्रॅक्टर तलावात पडल्याने 15 जणांचा मृत्यू झाला
या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. 4 मुलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातातील सर्व ट्रॅक्टरस्वार हे जायथरा पोलीस ठाण्याच्या छोटा कासा गावातील रहिवासी आहेत. माघ पौर्णिमेनिमित्त हे लोक कासगंजच्या पटियाली येथील कादरगंज गंगा घाटावर गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. दरियावगंज पटियाली रस्त्यावरील गढई गावाजवळ हा भीषण अपघात झाला. आज माघ पौर्णिमा आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक गंगेत स्नान करण्यासाठी येतात. गंगेत स्नान करण्यासाठी जात असतानाही हा अपघात झाला.
दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील हरदोई येथेही असाच एक रस्ता अपघात झाला होता. हरदोई येथील पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली गररा नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून नदीत पडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रॅक्टरवर २५ ते ३० शेतकरी स्वार होते, त्यापैकी ६ शेतकरी नदीत पोहत बाहेर आले होते, तर इतरांबाबत काहीही समजू शकले नाही. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू होते.