माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

0

मुंबई,दि.८: माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी म्हणाले की, मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज 48 वर्षांनी पक्ष सोडत आहे. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

आपण तातडीने राजीनामा देत असल्याचे बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी आपण वेळ आल्यावर सांगू असे म्हटलं होतं. मात्र आता बाबा सिद्दीकी यांनी अचानक राजीनामा देत पक्षाला रामराम केला आहे.

माजी मंत्री मिलिंद देवरां यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, अशी बातमी समोर आली होती.

त्यानंतर दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. झिशान यांनी हा दावा फेटाळून लावला होता. तर बाबा सिद्दीकी यांनी वेळ आल्यावर भूमिका मांडणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता सिद्दीकी यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here