‘मी 2 महिन्यांपूर्वीच शिंदे सरकारचा राजीनामा दिला आहे’ छगन भुजबळ

0

मुंबई,दि.4: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र सरकारमधील अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा खुलासा केला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी कोट्यात मागच्या दाराने प्रवेश देत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते भुजबळ शनिवारी (दि.3) अहमदनगरमधील सभेला संबोधित करताना म्हणाले की, मी मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या विरोधात नाही, तर सध्याचा ओबीसी कोटा वाटून घेण्याच्या विरोधात आहे. ते म्हणाले, “अनेक विरोधी नेते, अगदी माझ्या सरकारचे नेतेही म्हणतात की मी राजीनामा द्यावा, तर कोणी म्हणाले भुजबळांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा.”

छगन भुजबळ म्हणाले, “मला विरोधी पक्ष, सरकार आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना सांगायचे आहे की, 17 नोव्हेंबरला अंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यापूर्वी मी 16 नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेलो होतो.” 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलण्यास मनाई केल्याने दोन महिन्यांहून अधिक काळ आपण गप्प बसलो, असेही भुजबळ पुढे म्हणाले. ओबीसी नेते म्हणाले, “बरखास्तीची गरज नाही, मी राजीनामा दिला आहे. मी शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार आहे.” 

ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

वास्तविक, मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे. याबाबत छगन भुजबळ सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यानंतर सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबत छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केले आहे.  

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भुजबळांना बडतर्फ करावे, असे एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने म्हटले होते.  

आमचा मराठा समाजाला विरोध नाही

भुजबळ म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, त्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवे. ते आमच्या (ओबीसी) कोट्यातून देऊ नका, पण ते (मनोज जरांगे) म्हणतात ते ओबीसी कोट्यातून द्या.” 

सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाचे मागासलेपण निश्चित करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची आकडेवारी संकलित करण्याची प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप त्यांनी केला. 

ते म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येच्या ५४-६० टक्के ओबीसी आहेत, अनुसूचित जाती/जमाती २० टक्के आणि ब्राह्मण ३ टक्के आहेत, तरीही सर्व आमदार-खासदारांना मराठा मतं गमावण्याची भीती आहे.” भुजबळांनी दावा केला की, ओबीसी आमदार रॅलीत सहभागी होण्यास टाळाटाळ करतात. .ते तर दूरच, ते निधीतही मदत करत नाहीत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here