मुंबई,दि.१६: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले, ‘२२ जानेवारीचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम आहे. आम्ही सर्व धर्मांसोबत आहोत. मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही. मला त्यात रस नाही. मला माझ्या शर्टवर माझा धर्म घालण्याची गरज नाही. मात्र, ज्याला तिथे जायचे असेल तो जाऊ शकतो. पण त्या दिवशी आम्ही तिथे जाणार नाही. आमच्या पक्षातील कोणीही तिथे जाऊ शकतो. मात्र आम्ही राजकीय कार्यक्रमांना जाणार नाही.’
राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘मला वाटते की, जो खऱ्या अर्थाने धर्मावर विश्वास ठेवतो त्याचे त्याच्याशी वैयक्तिक नाते असते. मी माझे जीवन धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांशी योग्य वागतो आणि त्यांचा आदर करतो. मी द्वेष पसरवत नाही.
नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम बनवला
आरएसएस आणि भाजपने २२ जानेवारीच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम बनवला आहे. हा संघ आणि भाजपचा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले आहे. सर्व धर्मांना मानणारे आणि त्यांचा आदर करणार्यांपैकी आम्ही आहोत. हिंदू धर्मातील बड्या नेत्यांनीही आपले मत मांडले आहे. त्यांनी याला राजकीय कार्यक्रम असेही म्हटले आहे.
नागालँडमधील कोहिमा शहरात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या. राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत. मणिपूरपासून सुरू झालेला राहुल गांधींचा हा प्रवास सध्या नागालँडमध्ये आहे.