मुंबई,दि.13: कोरोनाचा सब व्हेरिएंट JN.1 ने चिंता वाढवली आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. अनेक राज्यात कोरोना रूग्णांची संख्या निरंक होती. आता परत एकदा कोरोनाच्या सब व्हेरिएंट JN.1 चे रूग्ण आढळत आहेत.
सब व्हेरिएंट JN 1 च्या प्रकरणांमध्ये देशात सातत्याने वाढ होताना दिसतेय. संपूर्ण देशभरात या JN 1 सब व्हेरिएंटच्या रूग्णांची आकडेवारी हजाराच्या पार गेली असल्याची माहिती आहे. यामध्ये एकूण 16 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
झी24 ने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकात सब व्हेरिएंटच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. ‘Indian SARS-CoV-2 Genomics Consortium’ (INSACOG) ने ही माहिती दिल्यानुसार, कर्नाटकात या सब व्हेरिएंटच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी 214 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. यानंतर तर महाराष्ट्रात 170, केरळमध्ये 154, आंध्र प्रदेशात 189, गुजरातमध्ये 76, गुजरातमध्ये 88 अशा रुग्णांची नोंद झाली आहे. तर तामिळनाडू आणि गोव्यात 90 आढळून आले आहेत.
याशिवाय तेलंगणा आणि राजस्थानमध्ये JN.1 सब व्हेरिएंटच्या रूग्णांची 32 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील JN.1 ची 25, दिल्लीतील 16, उत्तर प्रदेशातील सात, हरियाणामधील पाच, ओडिशातील तीन, पश्चिम बंगालमधील दोन आणि उत्तराखंडमधील एकाला JN.1 ची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
आत्तापर्यंत JN.1 देशातील 16 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला असल्याची माहिती आहे. त्यामुळे देशात एकूण 1104 प्रकरणं आढळून आली आहेत. या रूग्णांच्या संख्येचा आकडा हजारापार गेल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.