मुंबई,दि.25: देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनामुळे डोकेदुखी वाढली आहे. भारतात रविवारी कोरोनाचे 656 नवीन रुग्ण आढळून आले असून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या 24 तासांची आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण 3,742 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 128 नवीन कोरोनाबाधित आढळले असून कर्नाटकात 96 रुग्णांची नोंद झाली आहे.
JN.1 व्हेरियंटची लक्षण सौम्य
गेल्या काही आठवड्यांपासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. JN.1 या कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटने भारताचीच नाही तर जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 प्रकाराबाबत सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. भारताव्यतिरिक्त सिंगापूर आणि इंग्लंडसारख्या देशांमध्येही हा नवीन प्रकार आढळून आला आहे. दरम्यान, कोरोनाचा JN.1 सब-व्हेरियंट ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे. यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, या व्हेरियंटची लक्षण सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
• गेल्या 24 तासात देशात 656 नवीन कोरोना रुग्णांची नोंद.
• एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू .
• देशात एकूण 3,742 लोकांना कोरोनाची लागण
• केरळ आणि कर्नाटकमध्ये रुग्णांची सर्वाधिक संख्या
• सरकारकडून नवीन सब-व्हेरियंटबाबच JN.1 बद्दल धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
WHO चा इशारा
गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 20 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण 8,50,000 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरात गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे, यामध्ये 3,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरपासून ठाणे शहरात 20 रुग्णांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी जेएन.1 प्रकाराचे 5 रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात सध्या कोरोनाचे 27 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.