मुंबई,दि.१६: धारावी पुर्नविकासाच्या विरोधात शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वतीनं अदानींच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्र डागलं आहे. “५० खोके कमी पडायला लागले, म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला आहे.
यांना जर वाटत असेल, की सब भमी गोपाल की, तशी सब भूमी अदानीकी, तर असे अजिबात होऊ देणार नाही. आता तुमच्या लक्षात आले असेल की, अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार, गद्दारी करून यांनी पाडले, ते खोके कुणी पुरवले असतील? आता तुम्हाला लक्षात आले अलेल, खोके कुणाकडून गेले असतील? विमान कुणी पुरवले असेल? हॉटेल बुकिंग कुणी केले असतील? मुळात सरकार पाडण्याचे कारण आता तुम्हाला कळले असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ते धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाकडे देण्याच्या निर्णयाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करत होते.
…तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक
ठाकरे म्हणाले, “आज माझ्यासोबत सर्व पक्ष एकवटले आहेत. पण ज्या-ज्या वेळी मुंबईवर संकट आले, मग ते 1992-93 सालच्या दंगली असतील, बॉम्बस्फोट असतील, पूर असेल, काहीही असले, कोरोना होता. तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक. सर्व पक्ष माझ्यासोबत असतात. पण त्यांना जेव्हा कळले की, जोवर बसलेला आहे, तोवर मला मुंबई गिळता येणार नाही. मग हे सर्व कट कारस्थान तर शिजवले नाही ना, असा प्रश्न माझ्या मनात येतो. हे सर्व खोके, खोके सरकार, पन्नास खोके एकदम ओके, कशासाठी? कुणासाठी? कुणी दिले? हे आता उघडकीस आले आहे.”
“आपले सरकार असताना आपण, तुम्ही सांगा अडीच वर्षांच्या काळात, आपण कधी तरी धारावीचा गळा घोटू असा एक तरी जीआर काढला का? मग ते जे म्हणतायत 2018 साल, तेव्हा आम्ही नव्हतोच , तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्यामुळे पाप कुणाचं असेल, तर ते देवेंद्र यांचं आहे. पण आज जी आवई उठवली जाते, की शिवसेना ही विकासाच्या विरोधात आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.