सोलापूर,दि.11: राज्य सरकारच्या पती-पत्नी एकत्रिकरण योजनेअंतर्गत जवळच्या शाळेत रिक्त असलेल्या मुख्याध्यापक पदी बदली होण्यासाठी तक्रारदाराने प्राथमिक शिक्षण विभागाला अर्ज दिला होता. त्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास अण्णाराव चेळेकर याने 25 हजारांची लाच मागितली. पहिल्या टप्प्यात 15 हजारांची लाच द्या, अशा संभाषणावरून चेळेकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption bureau) अटक केली.
बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी चेळेकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण, शिक्षण, बांधकाम या विभागात सर्रासपणे लाच घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे या कारवयांतून स्पष्ट झाले आहे. चेळेकर याने तक्रारदाराकडे 25 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. जवळील शाळेत मुख्याध्यापक पदी बदली होण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. त्यासंदर्भात 8 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. दरम्यान, तक्रारदाराने चेळेकरचे संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार प्रमोद पकाले, अतुल घाडगे, गजानन किणगी, श्याम सुरवसे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. चेळेकरविरुद्ध आता निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ तीन दिवसात ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दुसरी कारवाई आहे. समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकाऱ्याला तीस हजारांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले होते. या घटनेमुळे बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस नाईक प्रमोद पकाले, अतुल घाडगे, गजानन किणगी यांच्या पथकाने केली.