मुंबई,दि.30: Exit Poll 2023: पाच राज्यामधील एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुका 2023 साठी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पाच राज्याच्या निवडणुका या सेमीफायनल म्हणून पाहिल्या जात आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. तर राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करणार असा अंदाज वर्तवला आहे.
देशातील पाच राज्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान झाले. हे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर येऊ लागले आहेत.
येत्या 3 डिसेंबर रोजी सर्व राज्यातील मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन निकालांचा अंदाज लावला जात आहे. एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशातकाँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसला येथे 111-121, तर भाजपला 106-116 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात बहुमताचा आकडा 116 आहे.
छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण जागा 90 आहेत. येथे काँग्रेसला 40-50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. येथे बहुमताचा आकडा 46 आहे.
छत्तीसगडमध्ये काय अंदाज?
छत्तीसगडच्या एक्झिट पोलच्या (Exit Poll) निकालानुसार काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारविरोधात सत्ताविरोधी लाट नाही. एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली आहे. एबीपी सी व्होटर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला कौल देण्यात आला आहे. याठिकाणी 41 ते 53 जागा, तर भाजपला 36 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना मिळू शकणाऱ्या जागांचे आकडे 1 ते 5 पर्यंत आहेत. अॅक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 40-50, भाजपला 36-46 आणि इतरांना 1 ते 5 जागा देण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण 90 जागा आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे. सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे 71, भाजपचे 13, बसपचे 2 आणि अजित जोगी यांच्या पक्षाचे 3 आमदार आहेत. एक जागा रिक्त आहे. काँग्रेसने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री केले होते.

मध्य प्रदेश
2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. बसपाने दोन तर सपाने एक जागा जिंकली. युती करून काँग्रेसने बहुमताचा 116 आकडा गाठला आणि कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसचे सरकार केवळ 15 महिने टिकू शकले. ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या 22 आमदारांनी राजीनामा दिला. यामध्ये 6 मंत्र्यांचा समावेश होता. शिंदे स्वतः भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. कोर्टाने कमलनाथ यांची फ्लोर टेस्ट करण्याचे आदेश दिले. चाचणीपूर्वी कमलनाथ यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपने बंडखोर आमदारांचे विलीनीकरण केले आणि शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
Exit Poll 2023: 5 राज्यांचे एक्झिट पोल
- TV9 ने दिलेल्या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात भाजपला 106-116, काँग्रेसला 111-121 आणि इतरांना 00-06 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
- रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 118-130 जागा मिळतील, काँग्रेसला 97-107 जागा मिळतील तर इतरांना 0-2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
- ‘जन की बात’ एक्झिट पोलनुसार, राजस्थानमध्ये भाजप सरकार बनवण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला 111, काँग्रेसला 74 आणि इतरांना 14 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
-‘जन की बात’ एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. भाजपला 116, काँग्रेसला 111 आणि इतरांना 03 जागा मिळताना दिसत आहेत.