अलिगढ,दि.२४: क्रिकेटर मिशेल मार्श विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवण्यात आले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं आणि मग ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो प्रचंड चर्चेत आला. हा फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला होता पण यावरून नंतर वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. तुमच्याही लक्षात आले असेल, हे प्रकरण म्हणजे मिशेल मार्शने विश्वचषकावर पाय ठेवून हातात बिअर घेत काढलेला फोटो. विश्वचषक अपात्र संघाच्या हाती पडल्यावर हा असा अपमान होणे साहजिकच आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती, अलीकडेच मोहम्मद शमीने सुद्धा मार्शच्या या फोटोबाबत निराशा व्यक्त केली. पण आता मिशेल मार्शच्या या फोटोमुळे भारतात चक्क एक एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समजतेय.
अलिगढमधील एका आरटीआय कार्यकर्त्याने मिशेलच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या खेळाडूला भारतात खेळण्यास बंदी घालण्याची विनंती केली आहे. आरटीआय कार्यकर्ते पंडित केशव यांनी ही तक्रार दाखल केली असून मार्शने वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. प्राप्त माहितीनुसार केशव यांनी तक्रारीची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवली आहे.
दरम्यान, मार्शने या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विजेतेपद जिंकल्यानंतर मार्श संघासह ऑस्ट्रेलियाला परतला आहे. दुसरीकडे, २३ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने नवा टी २० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या ८० आणि इशान किशन ५८ धावांच्या झंझावाती खेळीमुळे शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला होता.