मुंबई,दि.१४: भारताचे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गोयल यांनी याठिकाणी टेस्लाच्या प्लांटलाही भेट दिली. भारत सरकार टेस्लाला आयात शुल्कात सवलत देण्याच्या विचारात असताना पीयुष गोयल यांनी टेस्ला प्लांटला दिलेली भेट महत्त्वाची आहे. त्यात एलॉन मस्क यांनी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचीही माफी मागितली आहे. अखेर एलॉन मस्क यांना पीयुष गोयल यांची माफी मागण्याची गरज का पडली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल याचं कारण जाणून घेऊ.
एलॉन मस्कनं माफी का मागितली?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी भारताचे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील कंपनीच्या कारखान्याच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित राहू न शकल्याने माफी मागितली आहे. एलॉन मस्क म्हणाले की, गोयल यांनी फ्रेमोंट प्लांटला भेट देणे हा “सन्मान” आहे. याशिवाय भविष्यात तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी आज कॅलिफोर्नियाला भेट देऊ शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे, परंतु मी भविष्यात भेटण्यास उत्सुक आहे असं X वर गोयल यांच्या ट्विटला उत्तर देताना मस्क यांनी लिहिलं आहे.
भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. कंपनी भारतातून तिच्या वाहन घटकांची आयात दुप्पट करेल. मी आज टेस्लाच्या फ्रेमोंट, कॅलिफोर्निया येथील अत्याधुनिक उत्पादन युनिटला भेट दिली. यावेळी प्रतिभावान भारतीय इंजिनिअर आणि वित्त विभागात वरिष्ठ पदांवर भारतीयांना काम करताना पाहून चांगले वाटले. तसेच, मोटार वाहनांच्या जगात बदल करण्यात टेस्लाचे योगदान पाहून खूप आनंद झाला अशी पोस्ट गोयल यांनी केलीय.