सोलापूर,दि.४: सहामाही परीक्षेत विद्यार्थ्याने पहिल्या पानावर एक मराठा कोटी मराठा लिहून केली सुरुवात केल्याचा प्रकार घडला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील एका बारावीच्या विद्यार्थ्यांने सहामाही परीक्षा पेपर देताना, उत्तर पत्रिकेतून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्याने पहिल्या पानावर ‘एक मराठा कोटी मराठा’ लिहून उत्तर लिहिण्यास सुरुवात केल्याचा प्रकार घडला आहे. बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ बीबीदारफळ संचलित श्री गणेश विद्यालय बीबीदारफळ ता. उत्तर सोलापूर येथील हायस्कूलमध्ये बारावीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने सहामाहीचा पेपर सोडविताना चक्क एक मराठा कोटी मराठा अशी लिहून सुरुवात केली.
सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वत्र हायस्कूलमध्ये सहामाहीचे पेपर चालू आहेत. सगळीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून निषेध व्यक्त केला जातो. असेच बीबीदारफळ येथील संकेत लक्ष्मण साखरे या विद्यार्थ्याने तर सहामाही परीक्षेचा दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यशास्त्राचा पेपर दिला. पेपरची सुरुवातच चक्क जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, एक मराठा कोटी मराठा असे लिहून केली.
संकेत साखरे या बारावीच्या विद्यार्थ्याने दहावीनंतर आयटीआय शिक्षण घेतले आहे. तो सध्या लोकमंगल डिस्टलरी या प्रकल्पात हेल्पर म्हणून काम करीत आहे. शिक्षणाची इच्छा असल्याने तो नोकरी करून बी.बी. दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २००८ मध्ये वडिलांचे छत्र हरपले. सध्या त्याच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहेत.
टक्केवारी मिळवून तर काय उपयोग?
आम्हाला आरक्षणच मिळत नसेल तर शिक्षण घेऊन,किंवा चांगली टक्केवारी मिळवून तर काय उपयोग म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्तरपत्रिकेची सुरुवातच एक मराठा कोटी मराठा लिहून केली, असे विद्यार्थी संकेत साखरे यांनी सांगितले.