यवतमाळ,दि.28: यवतमाळमध्ये (Yavatmal) नागपूर तुळजापूर महामार्गावर (Nagpur Tuljapur Highway) 10 ते 12 अज्ञातांनी एसटी बस (ST Bus) पेटवल्याची घटना घडली. बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहेत. विदर्भ-मराठवाडा सीमेवर उमरखेडजवळील पैनगंगा नदी पुलावर हा प्रकार घडला. ही बस हातगाववरुन (Hatgaon) नागपूरकडे जात होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बस पेटवणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू आहे.
काय घडलं?
नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. बस पेटवली तेव्हा बसमध्ये 73 प्रवासी होते. प्रवासी तात्काळ बसमधून बाहरे आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व 73 प्रवाशी सुरक्षित आहेत. मात्र, लावलेल्या या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नांदेडच्या हातगाव आगाराची ही बस नागपूरकडे जात होती. त्याचवेळी मराठवाडा – विदर्भ सीमेवरच्या पैनगंगा नदीच्या पुलावर बसला थांबवत अज्ञात लोकांनी आग लावली आहे. या घटनेमागे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांचा हाथ असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन आधीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान, बस पेटवून देणारे नेमके कोण होते? याचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेत एमएच 20- जीसी 3189 या क्रमांकाच्या बसचे 32 लाख रुपयांचे नुकसान झाले. बस जाळनारे कोण होते, त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध उमरखेड पोलिस करीत आहे. या बसवर चालक बी.डी. नाईकवाडे, तर वाहक एस.एन. वाघमारे हे होते. घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांनी व इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली.