मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा राज ठाकरेंना धक्का

0

मुंबई,दि.१६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी राज ठाकरेंना धक्का दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून प्रत्येक मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचं काम सुरू आहे. असं असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंना मोठा धक्का बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके, महिला विभाग अध्यक्ष शहर शितल लोके आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण-डोंबिवली परिसरात न्यायालयीन लढाई लढणारे अॅड. सुहास तेलंग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी आणि ते ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात काम करतायत, ते पाहून दरदिवशी मोठ्या संख्येनं नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आमचे नेते आणि मुख्यमंत्री दिवसातील १६-१६ तास काम करत आहेत. जनतेसाठी झटत आहेत, हे लोकांना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत.”

“आज नांदीवलीमधून ओम लोके, सुहास तेलंग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. कल्याण लोकसभेत ज्याप्रकारे कामं सुरू आहेत. या कामांना प्रभावित होऊन आणि येथे आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी ज्याप्रकारे काम करतात, त्यांनी जशी संधी मिळते, ते पाहून मनसेचे पदाधिकारी आमच्याकडे आले,” असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

“राज्यात विकासाची घोडदौड पाहून सगळे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. येत्या काळात वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील,” असा विश्वासही खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here