मुंबई,दि.२१: Prakash Ambedkar On Manipur: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूर हिंसाचारावर संताप व्यक्त केला आहे. मणिपूर राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. दोन समुदाय एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने केंद्र सरकारही येथे शांतता प्रस्थापित करण्यास अपयशी ठरले आहे. दरम्यान, मे महिन्यात घडलेल्या एका भीषण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. दोन महिलांची निवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा प्रकार चार मे रोजी घडला. त्यावेळी पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करून घेतला. मात्र, त्यापुढे कारवाई केली नाही. परंतु, हा व्हिडीओ समाज माध्यमांवरून समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने कान टोचले, तेव्हा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संताप व्यक्त केला आहे. (Prakash Ambedkar On Manipur)
शासन भाजपचे असो वा इतर कोणाचे | Prakash Ambedkar On Manipur
प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. “मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटना नवीन नाहीत. या अगोदरही अशा घटना घडलेल्या आहेत. त्याविरोधात मणिपूरच्या महिलांनी सैन्याच्या ऑफिसवर नग्न मोर्चा काढला होता. शासन भाजपचे असो वा इतर कोणाचे, उत्तर पूर्वेच्या राज्यांची विशेष परिस्थिती लक्षात न घेता स्वतःचा मनमानी कारभार राबवल्यामुळे हा उद्रेक होतो आहे. सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय, उत्तर पूर्वेला तिबेट आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमांवर चीन वसाहती तयार करतोय. हा धोका आहे. जे लोक जसे आहेत तसं स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे. आपली संस्कृती इतरांवर लादणं बंद झालं तर संपूर्ण उत्तर पूर्व, सेव्हन सिस्टर्स अँड वन ब्रदर येथे शांतता नांदेल आणि ते भारताबरोबर रहातील अशी परिस्थिती आहे”, असं ट्वटी प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
“मणिपूर येथे घडलेल्या अमानवीय घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व सर्व गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करावी ही मागणी करतो”, असंही ते म्हणाले.
बुधवारी रात्री (१९ जुलै) सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या अमानवी गुन्ह्याला दोन महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.