मुंबई,दि.३: क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कारवाई केल्यापासून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले आहेत. नुकतेच नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यापासून सुरू झालेला हा वाद आता ‘नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस’ (Devendra Fadnavis) अशा वळणावर आला आहे. फडणवीस यांनी दिवाळीनंतर मलिक यांच्या विरोधात आरोपांचे व पुराव्यांचे बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी आणखी एक ट्वीट करून सस्पेन्स वाढवला आहे.
समीर वानखेडे यांनी केलेली कारवाईच बोगस असल्याचे सांगत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली होती. तसेच समीर वानखेडे मुस्लिम असून त्यांनी धर्म बदलून नोकरी मिळविल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे हे बॉलीवूड कलाकारांना ब्लॅकमेल करून खंडणी गोळा करत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. वसुलीसाठी वानखेडे यांनी प्रायव्हेट आर्मी तयार केल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता.
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
नवाब मलिक यांनी जाहीर केलेल्या काही पुराव्यांमुळं एनसीबीला वानखेडे यांची चौकशी करावी लागली आहे. मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणाशी भाजपचाही संबंध असल्याचा आरोप केला आहे. अलीकडंच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नीचे ड्रग पेडलकर जयदीप राणा याच्याशी संबंध असल्याचाही गौप्यस्फोट केला आहे. त्यास उत्तर देताना फडणवीसांनी मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. दिवाळीनंतर त्याचे पुरावे मीडियासमोर ठेवणार, असा इशारा दिला आहे.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय हो
होटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
फडणवीसांचं हे आव्हान स्वीकारणाऱ्या नवाब मलिक यांनीही आता दिवाळीनंतर धमाका करण्याची तयारी केली आहे. आज एका मागोमाग एक ट्वीट करून त्यांनी याची चुणूक दाखवली आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे…’ असं मलिक यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर, काही वेळानंतर त्यांनी दुसरं ट्वीट केलं आहे. त्याद्वारे त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांची दिवाळी मंगलमय व्हावी, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतील ‘द ललित’ हॉटेलचाही उल्लेख केला आहे. या हॉटेलमध्ये अनेक गुपितं लपली आहेत. रविवारी भेटू,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘हॉटेल ललित’मध्ये नेमकं काय घडलंय? त्याचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.