मुंबई,दि.15: Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संपूर्ण विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला असून सर्वच जिल्ह्यांत पावसाची रिपरिप बघायला मिळणार आहे. सोबतच, कोकणातच देखील पावसाचा जोर वाढणार असून शेतकऱ्यांची चिंता मिटण्याची आशा आहे. (Maharashtra Rain)
राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी पावसाची तूट असल्याचं चित्र आहे. पेरण्यांना ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे तर कुठे दुबार पेरण्या होत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेतकरी काहीसा सुखावणार आहे.
हवामान विभागाने दिला इशारा | Maharashtra Rain
संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा. विदर्भात पुढील पाच दिवसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा. 17 जुलैपासून पुन्हा तळ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. सोबतच उत्तर महाराष्ट्रात आज विजांसह पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवस जरी पावसाचा अंदाज असला तरी मागील दीड महिन्यात राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची मोठी तूट बघायला मिळत आहे. हिंगोली आणि सांगलीत तर मोठी भीषणपरिस्थिती आहे. 15 जुलैपर्यंत हिंगोतील सरासरीच्या फक्त 24 टक्के तर सांगलीत फक्त 28 टक्के पाऊस झालाय.
राज्यात 1 जून ते 15 जुलैपर्यंत 350 मिमीपैकी 276 मिमी पाऊस झाला आहे. ज्यात संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा तर सध्या 21 टक्के तूट बघायला मिळत आहे. हिंगोलीत सरासरीच्या फक्त 24 टक्के तर सांगलीत सरासरीच्या 28 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात लातूर जिल्हा सोडता एकाही जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस नाही.
सोबतच जालन्यात 46 टक्के, अकोल्यात 58 टक्के, सोलापूर 53 टक्के, कोल्हापुरात 65 टक्के, वर्ध्यात 64 टक्के सरासरीच्या पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची तूट धरणांमधल्या पाणीसाठ्याबाबत चिंतेचा विषय ठरतोय.
राज्यात पुढील 15 दिवस पावसाळी असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. 18 जुलैपासून मुंबई आणि उपनगरात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात देखील येत्या दिवसात पावसाचा जोर वाढेल अशीअपेक्षा आहे.