Sunil Prabhu: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका केली ही मागणी

0

नवी दिल्ली,दि.४: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर घडवून ते मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यासंदर्भात निर्णय दिला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ११ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले, तसेच विधिमंडळात घडलेल्या अनेक घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. परंतु आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका | Sunil Prabhu

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. या सुनावणीला आता दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आहे.

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत. सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घायला सांगितलं होतं. या आमदारांविरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे.

सुनील प्रभू यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी दिलेल्या निकालात सांगितलं होतं की, आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय वाजवी वेळेत (Reasonable Period) घ्यावा. परंतु यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणतंही पाऊल उचलेलं नाही. आम्ही (ठाकरे गट) विधानसभा अध्यक्षांना आतापर्यंत तीन वेळा निवेदन दिलं आहे, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here