मुंबई,दि.३: NCP Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडावर मोठे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर बंडखोर राष्ट्रवादी आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेतला. रात्री उशिरा आव्हाडांनी अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. मात्र या पत्राला काही अर्थ नाही. आम्ही घेतलेली भूमिका पक्षाच्या हितासाठी आहे असं सांगत अजित पवारांनीजयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला.
अजित पवार म्हणाले… | NCP Crisis
अजित पवार म्हणाले की, काल बातमीत पाहिले, एकाला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून नेमले गेले. मी बरेच वर्ष विधिमंडळात काम केले. विरोधी पक्षनेता नेमण्याचे काम विधानसभा अध्यक्ष करतात. विरोधात सगळ्यात जास्त संख्या ज्यांची असते त्यांचा विरोधी पक्षनेता घोषित केला जातो. आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी यासाठी काही विधाने केली जातात त्याला अर्थ नाही. बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्यासोबत आहेत. संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत राहणार असं सांगत अजितदादांनी नाव न घेता आव्हाडांवर निशाणा साधला.
तसेच देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. त्यालाही पाठिंबा देत केंद्राचा फायदा राज्याच्या विकासासाठी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या विचारांचे असले तरी विकासकामांच्या बाबतीत कमतरता राहते. हे अनेक वर्ष बघत आलोय. काल काहींनी पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असल्याने आम्ही जे करतोय पक्षाचे हिताचे करतोय. नोटीस काढण्याचा अधिकार त्यांना नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे. आमच्यासोबतचे आमदार भवितव्य व्यवस्थित कसे राहील. कुठल्याही घटनेची कायद्याची अडचण येणार नाही याची खबरदारी आम्ही घेतोय असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.