दि.30: कन्नड सिनेसृष्टीतील “पॉवर स्टार” आणि सेलिब्रिटी टेलिव्हिजन होस्ट पुनीत राजकुमार यांनी मृत्यूनंतरही एक आदर्श ठेवला आहे. या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वडिलांप्रमाणेच अभिनेता पुनीत राजकुमारचेही डोळे दान करण्यात आले. पुनीत कुमारचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते डॉ राजकुमार यांनी स्वतः 1994 मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. राजकुमार यांचेही 12 एप्रिल 2006 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले होते.
अभिनेता चेतन कुमार अहिंसा यांनी ट्विट केले की, डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या (पुनीत राजकुमार) मृत्यूनंतर सहा तासांत प्रक्रिया पूर्ण केली. अभिनेत्याने ट्विट केले की, “मी अप्पू सरांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो असताना, त्यांच्या मृत्यूच्या 6 तासांच्या आत, डॉक्टरांचा एक गट त्यांचे डोळे काढण्यासाठी आला. जसे डॉ. राजकुमार आणि निम्मा शिवन्ना यांनी त्यांचे डोळे दान केले, तसेच अप्पू सरांनीही डोळे दान केले.” अभिनेता चेतनने ट्विट करत, “त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि अप्पू सरांच्या स्मरणार्थ” सर्वांना नेत्रदान करण्याचे आवाहन केले आहे.
फिटनेसची आवड असलेल्या पुनीत राजकुमारने जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी रेवंत आणि दोन मुली धृती आणि वंदिता असा परिवार आहे.
शोक व्यक
पुनीत राजकुमार यांच्या निधनावर देशातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही ट्विट करून अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “नियतीच्या एका क्रूर वळणाने आमच्याकडून प्रतिभावान अभिनेता पुनीत राजकुमार हिरावून घेतला. जाण्याचे वय नव्हते. येणाऱ्या पिढ्या त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या अप्रतिम व्यक्तिमत्त्वासाठी त्यांची आठवण ठेवतील.” तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी हे ट्विट केलं आहे.
पॉवर स्टार पुनीत राजकुमार, जे दिवंगत प्रसिद्ध कन्नड स्टार राजकुमार अवरगल यांचे पुत्र होते. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक दशकांपासून सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे, असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ट्विट केलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे. ‘कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी मनःपूर्वक संवेदना…. खूप लवकर गेले’, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं.