Saamana On NCP: दैनिक सामनातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

0

मुंबई,दि.8: Saamana On NCP: दैनिक सामना अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला अशा शब्दात सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. 

पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे… | Saamana On NCP

त्याचसोबत नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून ‘यापुढे तुम्ही आणि तुम्हीच’, असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीसही ‘हायसं’ वाटले. पवारांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे असं सांगत ठाकरे गटाने अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत, तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकानं करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला आहे. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्राचे, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो’, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

पुढे अग्रलेखात म्हटलं आहे की, ‘शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते. व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग -बोर्डिंगची’ व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा प्लान कचऱ्याच्या टोपलीत गेला. व त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता. पण पवारांनी तसे करण्यास नकार दिला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here