मुंबई,दि.3: NCP News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली आहे. “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी जाहीर केलं. ते मंगळवारी (2 मे) मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्षाची निवड तुर्तास न करता कार्याध्यक्षाची निवड केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीच्या पक्ष घटनेत कार्याध्यक्षपदाची तरदूत नाहीये. त्यामुळे हा विचार मागे पडला आहे. दुसरीकडे शरद पवार हे आपला निर्णय बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या नावाला पसंती | NCP News
दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांच्या नावाला पक्षातील विरिष्ठ नेत्यांनी पसंती दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे याच आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होण्याची शक्यता आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी चार नावांची चर्चा आहे. ज्यामध्ये सर्वात आघाडीवर सुप्रिया सुळे यांचं नाव आहे, त्यानंतर छगन भुजबळ, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
दरम्यान दुसरीकडे राज्याची धुरा अजित पवार यांच्या हाती सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे वरीष्ठ नेत्यांची राष्ट्रीय पातळीवरील कोअर कमिटी करुन त्यात अजित पवारांसह अनेक वरीष्ठ नेत्यांचा समावेश करण्यावर ही प्राथमिक चर्चा झाली आहे.