Ajit Pawar On NCP: शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.2: Ajit Pawar On NCP: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि देशातील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावूक झाले. 

अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया | Ajit Pawar On NCP

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे सर्व नेत्यांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली तर अजित पवार यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘सगळ्यांच्या भावना ऐकल्या, मात्र या निर्णयाबद्दल सर्वांनी गैरसमज करुन घेतला आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत, म्हणजे पक्षात नाही असं नाही. कॉंग्रेस पक्षाबाबत आपण पाहत आहोत, खर्गे अध्यक्ष असतील तरी पक्ष सोनिया गांधी चालवतात. साहेब नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार झालेला तुम्हाला मान्य नाही का?’

एवढी खात्री मी तुम्हाला देतो…

‘एखाद्या व्यक्तीचे वय झाले की, नवीन लोकांना संधी दिली जाते. कोणीही अध्यक्ष झाला तरी, पक्ष साहेबांच्याच जीवावर चालणार आहे. तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. साहेबांनी एक आवाहन केले आहे, पक्षाची कमिटी पुढचा निर्णय घेईल. ही कमिटी एकंदरीत लोकांचा आलेला कौल लक्षात घेईल. या कमिटीनेच पुढच्या गोष्टी ठरव्यात. ते जे ठरवतील ते साहेबांना मान्य आहे. कमिटी म्हणजे कुठली बाहेरची लोकं नाहीत. या कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातीलच लोकं असतील. मी असेल सुप्रिया असेल आणि इतर सर्वजण असतील. कमिटी तुमच्या मनातला योग्य निर्णय घेईल, एवढी खात्री मी तुम्हाला देतो’, असंही अजित पवार यावेली म्हणाले.

आज ना उद्या हा निर्णय होणार होता. आज घेतलेला निर्णय कालच होणार होता, मात्र काल 1 मे आणि वज्रमूठ सभा असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आता तुम्ही भावनिक होऊन आमच्याकडे पर्याय नाही असं म्हणू नका. साहेबांनी फक्त पक्षाचा राजीनामा दिला आहे, ते पुर्वीसारखं सगळीकडे फिरताना दिसणार आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष तयार होणार आहे. नवीन अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नव्या गोष्टी शिकत जाईल. साहेबांच्या डोळ्या देखत नवं नेतृत्व तयार झालं तर तुम्हाला का नको रे? नवीन अध्यक्ष झाल्यावर साहेब त्याला राजकारणातले बारकावे सांगतील. आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ, त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू,’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असा निर्णय शरद पवारांनी जाहीर केल्यावर यशवंतराव चव्हाण सभागृह घोषणांनी दणाणलं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार…’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवार यांना स्टेजवर जाऊन विनवणी केली. आमदार धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे पायही धरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

सुप्रिया, तू बोलू नको. तिचा मोठा भाऊ म्हणून…

यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना शरद पवारांना समजवण्याची विनंती केली. तेव्हा अजित पवारांनी मध्यस्थी करत, “सुप्रिया, तू बोलू नको. तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय. गप्प बसा बाकीचे,” अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here