सोलापूर बार असोसिएशनवर ॲड. ठोकडे यांच्या विधी विकास पॅनलचे वर्चस्व

0

सोलापूर,दि.२८: सोलापूर बार असोसिएशनवर ॲड. ठोकडे यांच्या विधी विकास पॅनलने वर्चस्व मिळविले असून चार जागासाठी झालेल्या मतदानात तीन जागा विधी विकास पॅनलने जिंकल्या आहेत तर केवळ एका जागेवर ॲड. गायकवाड यांच्या परिवर्तन पॅनेलला समाधान मानावे लागले.

बुधवारी येथील बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी १३३४ सभासदांपैकी ११२८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ॲड. ठोकडे यांचे विधी विकास पॅनल व ॲड. गायकवाड यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये अटीतटीची लढत झाली. अध्यक्षपदासाठी विधी विकास पॅनेलच्या ॲड. नीलेश ठोकडे यांना ६४१ तर विरोधी ॲड. सुरेश गायकवाड यांना ४७६ मते पडली.

उपाध्यक्षपदासाठी ॲड. नीलेश जोशी (विधी विकास) यांना ३८७, असीम बांगी (परिवर्तन) यांना ३८२ तर श्याम बिराजदार (अपक्ष) यांना २१३ आनंद काळे (अपक्ष) यांना ११४ मते पडली. परिवर्तनमधून पॅनलमधून सचिवपदासाठी ॲड. अविनाश बिराजदार यांना ६०५ मते तर विधी विकासमधील ॲड. मनोज पामूल यांना ४९७ मते पडली.

खजिनदारपदासाठी ॲड. चंद्रसेन गायकवाड (विधी विकास) यांना ६०० तर दयानंद माळी (परिवर्तन) यांना ५१० मते पडली. विधी विकास पॅनलमधून ॲड. ठोकडे, ॲड.जोशी, ॲड.गायकवाड हे विजयी झाले तर परिवर्तन पॅनलमधून ॲड. बिराजदार हे विजयी झाले.
ॲड. अलका मोरे यांची सहसचिवपदी
बिनविरोध निवड झाली होती.

बुधवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. बसवराज सलगर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपाध्यक्ष ॲड. गणेश पवार, सचिव ॲड. अभिषेक गुंड, खजिनदार ॲड. हेमंत साका व सहसचिव ॲड. वैशाली बनसोडे यांनी काम पाहिले. विधी विकास पॅनेलने सभासदांच्या होम टू होम प्रचारावर भर दिला होता. पॅनेलच्या विजयासाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, ज्येष्ठ विधिज्ञ उमेश मराठे यांच्यासह ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांनी प्रयत्न केले. विजयानंतर विधी विकास पॅनलकडून जल्लोष साजरा करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here