राजगड,दि.१०: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांच्या कारने राजगडमध्ये (Rajgarh) एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर स्वत: दिग्विजय सिंह यांनी गाडीतून उतरुन युवकाला जवळील रुग्णालयात दाखल केले. तरुणाच्या डोक्याला जखम झाली असल्याने जीरापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून युवकास भोपाळला हलविण्यात आले आहे. मुलगा अचानक कारसमोर आल्यानेच ही दुर्घटना घडली असून मी युवकाच्या प्रकृतीसंदर्भात सर्वोतोपरी माहिती घेत असल्याचं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं.
दिग्विजय सिंह हे राजगढ़ येथून कोडक्या गांवातील कँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश यांच्याकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते. तेथून जीरापूरकडे त्यांच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात परोलिया निवासी २८ वर्षीय युवक बबलू गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दिग्विजय सिंह यांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गाडीही ताब्यात घेतली आहे. त्यामुळे, दिग्विजय सिंह ब्यावराच्या आमदारांच्या गाडीतून निघून गेले.
जीरापूरजवळ ही दुर्घटना घडली असून सुदैवाने युवकास जास्त गंभीर जखम झाली नाही. तरीही, काळजीपोटी आम्ही त्यास भोपाळ येथील रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितलं की, युवकाची प्रकृती स्थीर असून पुढील तपासण्यांसाठी त्यास भोपाळच्या चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेला युवक मजदुरीचे काम करतो. तो परोलिया येथून जीजापूरला कामानिमित्त आला होता.