दि.२३: काश्मीर हे देशात सर्वाधिक भ्रष्ट स्थान असल्याची टीका राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली. देशात ४ – ५ टक्क्यांचं कमिशन मागितलं जातं, परंतु, काश्मीरमध्ये तब्बल १५ टक्क्यांपर्यंत कमिशनची मागणी केली जाते, असा दावा जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल यांनी केलाय. ‘अंबानी’ आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ संबंधित व्यक्तींकडून आपल्याला तब्बल ३०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गौप्यस्फोटही राज्यपाल मलिक यांनी केला आहे.
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच एक मोठा दावा करत राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवून दिलीय. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपालपदी कार्यरत असताना आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी केलाय. राजस्थानच्या झुंझुनूमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त विधानांपैंकी हे एक विधान ठरलं.
दोन फायलींना मंजुरी मिळवण्यासाठी ‘अंबानी’ आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ संबंधित व्यक्तींनी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केलाय. मात्र, ही ऑफर आपण धुडकावून लावल्याचं मलिक यांनी म्हटलंय.
याचवेळी सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मात्र कौतुक केलं. ‘भ्रष्टाचाराशी कोणतीही तडजोड करू नका’ असा सल्ला पंतप्रधानांनी दिल्याचं सत्यपाल मलिक यांनी यावेळी म्हटलं.
‘काश्मीरला दाखल झाल्यानंतर माझ्यासमोर दोन फायली आल्या होत्या. एक अंबानींची फाईल होती तर दुसरी आरएसएसशी निगडीत एका व्यक्तीची, ही व्यक्ती अगोदरच्या मेहबुबा मुफ्ती आणि भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्रीही होती. तसंच ही व्यक्ती पंतप्रधानांच्या अगदी जवळची व्यक्ती होती. या फायलींमध्ये घोळ असल्याची सूचना मला दिली. त्यानंतर मी एकानंतर एक अशा दोन्ही डील रद्द केल्या. प्रत्येक फायलींसाठी १५० – १५० कोटी रुपये देण्याची संबंधितांची तयारी असल्याचं सचिवांनी मला सांगितलं. पण, मी पाच कुर्ते – पायजमा घेऊन आलोय आणि त्यासोबतच इथून जाईन, असं त्यांना सांगितलं’ असं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं.