मुंबई,दि.9: सामना अग्रलेख | गुजराती मनावर मोदीची मोहिनी आहे व मोदी हीच गुजरातची अस्मिता असल्याचे दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election 2022) भाजपाला (BJP) एकतर्फी विजय मिळाला. भाजपा सातव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (शुक्रवार, 08 डिसेंबर) लागले. यात गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला तर हिमाचलमध्ये त्यांनी सत्ता गमावली. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून गुजरातमधील विजयाचं श्रेय फक्त मोदींचेच असल्याचं म्हटलं.
सामना अग्रलेख | हिमाचलमध्ये आमदार फोडू शकतात
तर दुसऱ्या बाजूला हिमाचलमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी तिथे ते आमदार फोडू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे. भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असून नैतिक, अनैतिक हे शब्द निरर्थक असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. गुजरात विजयाचा जल्लोष भाजप नेते करत असताना दिल्ली, हिमाचल प्रदेश गमावलं त्यावर कुणीच बोलत नाही, असे का असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
सामना अग्रलेख | मोदी हीच गुजरातची अस्मिता
देशात तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या व निकाल लागून विजयाचे उत्सव पार पडले. गुजरात विधानसभा निवडणुकांचे काय निकाल लागणार, यावर अजिबात चर्चा करण्याची गरज नव्हती. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विजय झाला आहे. ‘‘आजचा गुजरात मी बनवला आहे, हे गुजरात माझे आहे,’’ असा प्रचार पंतप्रधान मोदी यांनी केला व गुजराती जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. मोदी हे गुजरातचे पंधरा वर्षे मुख्यमंत्री होते व या काळात गुजरातने प्रगती केली. पंतप्रधान म्हणूनही मोदी यांनी गुजरातकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचे श्रेय फक्त मोदी यांनाच द्यायला हवे. गुजराती मनावर मोदीची मोहिनी आहे व मोदी हीच गुजरातची अस्मिता असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

सामना अग्रलेख | भाजपाने नवा विक्रम केला
गुजरातमध्ये काँग्रेसची वाताहत झाली असल्याचं अग्रलेखात म्हटलंय. काँग्रेस किमान पन्नास जागांपर्यंत पोहोचेल व पराभवातही प्रतिष्ठा ठेवेल अशी अनेकांची भाबडी आशा होती. काँग्रेस 20 जागांचा टप्पाही पार करू शकली नाही. 1985 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या. हा विक्रम आतापर्यंत कायम होता. यावेळी ‘149’ चा आकडा पार करू असे भाजपचे प्रमुख नेते सांगत होते. तसा आकडा पार करून भाजपने नवा विक्रम निर्माण केला. भाजपाच्या गणित तज्ञांचेही कौतुक करावेच लागेल. ते एक आकडा देतात व तसाच आकडा निकालातून बाहेर येतो. हा मोठाच चमत्कार म्हणावा लागेल. गुजरातमध्ये भाजपाच जिंकेल याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नव्हते.
सामना अग्रलेख | मंत्रिमंडळ बदलाचा भाजपला फायदा
कोरोना काळात गुजरातमध्ये सर्वात जास्त हाहाकार माजला. इस्पितळांत जागा नव्हती. स्मशानात आप्तांचे मृतदेह घेऊन रांगा लागल्या होत्या. तरीही लोकांनी मोदींच्या पारडय़ात मते टाकली. हे त्यांच्या नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणेमुळे व पंतप्रधान असले तरी आपल्या गृहराज्याकडे बारीक लक्ष असल्यानेच घडले. निवडणुकीपूर्वी मोरबी पूल दुर्घटना घडली. दुःखाची लाट उसळली. पण त्या लाटेचा तडाखा मोदी लाटेस बसला नाही. कारण मोदी हे गुजरातचे गौरव पुरुष आहेत. भूपेश पटेल हे मुख्यमंत्री म्हणून नवे होते. मंत्रिमंडळातून सर्व जुने चेहरे बदलून मोदी यांनी धक्का दिला. ती कोरी पाटी घेऊन मोदी निवडणुकीत उतरल्याचा फायदा झाला असं शिवसेनेनं म्हटलं आहे.