हांसी,दि.17: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh Arrested) याला हरियाणामधल्या हिसार पोलिसांनी अटक केली आहे. हांसी शहर पोलीस स्टेशनमध्ये युवराज सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. युवराजनं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यावर जातीवाचक टिप्पणी केली होती आणि त्याविरोधात हांसी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. त्यानं ही टिप्पणी मागच्या वर्षी रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅट दरम्यान केली होती आणि त्यात त्यानं युझवेंद्र चहलवर अपमानजनक टिप्पणी केली होती.
हांसी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर युवराजला औपचारिक जामिनावर सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात हायकोर्टानं युवराजला जामिन दिला होता. हांसी पोलिसांनी औपचारिकता म्हणून त्याला अटक केली. यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आणि नंतर त्याला सोडण्यात आले. युवराजसह सुरक्षारक्षक आणि 4-5 स्टाफ व वकील होते.
रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये युवराजने अनुसुचित जातींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप दलित अधिकार कार्यकर्ते रजत कलसन यांनी केला होता. यानंतर युवराजविरुद्ध हांसीमध्ये SC-ST एक्ट आणि आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी युवराजने हायकोर्टाचं दार ठोठावलं होतं, यानंतर हायकोर्टाने युवराजविरुद्ध पोलिसांच्या कारवाईवर बंदी आणली होती.