नवी दिल्ली,दि.१५: Delhi Shraddha Murder Case: आफताब अमीन पूनावालाने आपल्या प्रेयसीची (श्रद्धा वालकर) निर्घृणपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांच्या सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या माहितीनुसार आफताबचे श्रद्धाच्या आधीही अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध होते. श्रद्धा वालकर या 26 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आफताबने गुगलवरुन या हत्येसंदर्भातील माहिती शोधल्याचा जबाब नोंदवला आहे. रक्त साफ करण्यासाठी काय करता येईल इथपासून ते मानवी शरिराची रचना कशी असे इथपर्यंत अनेक गोष्टी आफताबने गुगलवर शोधल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. पोलिसांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची दिल्लीमधील राहत्या घरी हत्या केली. त्यानंतर पुढील अनेक दिवस तो श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं काम करत होता. मृतदेहाची विल्वेहाट लावण्यासाठी त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने 300 लीटर क्षमतेचा एक फ्रिजही विकत घेतला. तसेच तपासादरम्यान आफताबने पोलिसांना आपण गुगलवर मानवी शरीराच्या रचनेसंदर्भात सविस्तर वाचन केल्याचीही कबुली दिली. मृतदेहाचे तुकडे करताना आपल्याला अडचण येऊ नये म्हणून हे वाचन केल्याचं आफताब म्हणाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी आफताबच्या मालकीचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट ताब्यात घेतले आहेत. सध्या पोलीस आफताबच्या मालिकेच्या गॅजेट्सची तपासणी करत आहेत. गुगल सर्च हिस्ट्री आणि इतर तपासावरुन आफताबच्या दाव्यांबद्दलचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मृतदेहाचे केले ३५ तुकडे
हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगलातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध ठिकाणी फेकून देत मृतदेहाची विल्हेवाट लावली. यासाठी त्याने मोठा फ्रिज, पॉलिथीन बॅग घरी आणल्या होत्या. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. घरामध्ये मृतदेहाच्या तुकड्यांमुळे दुर्गंधी येऊन म्हणून तो घरात नेहमी आगरबत्ती लावत असे असंही तपासामध्ये समोर आलं आहे.
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला Google चा वापर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब गुगलवर सर्च करुन पुरावे मिटवायचा. यामध्ये फरशीवरील रक्ताचे डाग कसे पुसावेत, यासाठी कोणते रसायन वापरावे, रक्ताचे डाग पुसलेल्या कपड्यांची विल्हेवाट कशी लावावी यासारखे सर्च आफताबने गुगलवर केल्याचं समोर आलं आहे. १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह घरातील बाथरुममध्ये ठेवला होता. श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. २०१८ पासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. घरच्यांनी विरोध केल्याने दोघे आधी मुंबईत एकत्र राहत होते. नंतर ते नोकरीनिमित्त दिल्लीला स्थायिक झालेले.
फ्रीज विकत घेतला
श्रद्धाचा गळा दाबून तिला ठार केल्यानंतर आफताबने जवळच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामधून मोठा फ्रिज विकत घेतला. त्यानंतर त्याने बाथरुममध्ये ठेवलेला श्रद्धाचा मृतदेहाचे घरातच तुकडे केले. हा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवता यावा यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे केले. पुढील १८ दिवसांमध्ये तो रोज मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे वेगवेगळ्या भागांमध्ये टाकत होता. तो पॉलिथीन बॅगमधून तुकडा घेऊन जायचा आणि जंगली भागामध्ये भिरकावून द्यायचा. मात्र हा तुकडा टाकताना तो पॉलिथीन बॅगसहीत फेकायचा नाही. तुकड्याची लवकर विल्हेवाट लागावी म्हणून तो नुसता तुकडाच फेकून द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.
कशी झाली ओळख
श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१८ पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी-वन अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या दोघांची भेट एका डेटिंग ॲपवर मुंबईत असताना झाली. दोघे मागील तीन वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते. नोकरीनिमित्त ते दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने याच संतापातून तिची हत्या केली.”
लग्नाच्या मुद्द्यावरुन वाद
“आरोपी आणि श्रद्धाचं अनेकदा लग्नाच्या मुद्द्यावरुन वाद व्हायचे. १८ मे रोजी झालेल्या वादादरम्यान आफताबने गळा आवळून श्रद्धाची हत्या केली,” असंही चौहान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं. “आरोपीने मृतदेहाचे तुकडे केल्याचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर तो हे तुकडे छत्तरपूर येथील जंगली भागामध्ये एक-एक करुन नेऊन फेकायचा. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे,” असं चौहान यांनी सांगितलं. ज्या रुममध्ये आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले त्याच रुममध्ये तो मागील सहा महिन्यांपासून झोपत होता. फ्रिजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचा चेहरा तो रोज पहायचा. त्याने मृतदेहाच्या ३५ तुकड्यांची विल्हेवाट लावल्यानंतर फ्रिज साफ केला होता, असंही पोलिसांच्या सुत्रांनी सांगितलं.