सोलापूर,दि.३: मोहोळ तालुक्यातील वाघोली ते कुरुल रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वाघोली ते कुरूल रस्ता २५ वर्षापासून खराब अवस्थेमध्ये आहे. गावकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या खड्यात पाणी साचल्याने या रस्त्याचा वापर करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
हा रस्ता मोहोळच्या दक्षिण भागांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता कुरुल, वाघोली व जामगाव या गावांना जोडला जातो. या भागात साखर कारखाना, महात्मा फुले सूतगिरणी व महात्मा गांधी विद्यालय असल्याने वाघोली ते कुरुल रस्त्यावर रहदारी जास्त असते. खराब रस्त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.