मुंबई,दि.३०: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिल्लीतील राजकारणासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून लौकिक कमावलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी दिल्लीतील राजकारणासंदर्भात भाष्य केले आहे. मी राजकारणात गेल्यानंतर दिल्लीला गेलो. आजपर्यंत अनेक लोकांना भेटलो. खूप मोठी वाटणारी माणसं खुजी निघाली. छोटी वाटणारी माणसं उत्तुंग होती. असे अनेक अनुभव घेतले. पण दिल्लीचे पाणी चांगले नाही. आपला महाराष्ट्रच चांगला आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईच्या आयआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यामुळे गडकरी यांचा ‘खुजी लोकं’ या वक्तव्याचा रोख नेमका रोख कुणाकडे? अशी चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भाजपच्या संसदीय समितीमधून गच्छंती झाली होती. तेव्हापासून नितीन गडकरी यांना भाजप पक्षसंघटनेत बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांची अलीकडच्या काळातील अनेक वक्तव्यं ही एकप्रकारचा गर्भित इशारा असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांचे दिल्लीतील राजकारणाविषयीचे विधानही चर्चेचा विषय ठरत आहे.
यावेळी नितीन गडकरी यांनी आगामी लोकसभा निवडणूक भरघोस मतांनी जिंकणार असल्याचा दावाही केला. मी माझ्या मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी जिंकलो, पुढच्या वेळेस पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रशासकीय काम करताना अहंकारामुळं अनेकदा मॅनेजमेंट लेव्हलला अडचणी निर्माण होतात. संबंध कसे असावे हा सगळीकडेच महत्वाचा विषय आहे, आपण आयात काय करतो ते बघा. त्याला पर्याय शोधा, त्यावर रिसर्च करा त्याचा खूप फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले. मला भारतातून पेट्रोल-डिझेलला हद्दपार करायचे आहे. हा एक अवघड संकल्प असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले.