उद्धव ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला मोठा दिलासा

0

मुंबई,दि.13: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना शिवसेनेने (ठाकरे गट) उमेदवारी जाहीर केली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिका कर्मचारी आहेत. त्यांनी आपला राजीनामा दिला होता. मात्र तो अद्याप मंजूर झाला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याशिवाय त्यांना उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला आज हायकोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवार याआधीच जाहीर करण्यात आले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अडचणीत सापडली होती.

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महापालिकेत कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या महापालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा जोपर्यंत मंजूर करण्यात येत नाही तोपर्यंत त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार नव्हता. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक होते. पण महापालिका प्रशासनाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मोठं राजकीय घमासान बघायला मिळालं. अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. अखेर मुंबई महापालिकेच्या वरिष्ठांनी ऋतुजा लटरे यांचा राजीनामा स्वीकार करावा यासाठी ठाकरे गट मुंबई हायकोर्टात गेलं. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी लटके यांना दिलासा दिला.

मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी सुनावणी देताना मुंबई महापालिका प्रशासनाला ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा स्वीकार करावा, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच पालिका आयुक्तांनी राजीनामा मंजुरीबाबत ऋतुजा लटके यांना स्पष्ट रिप्लाय द्यावा आणि कोर्टाला माहिती द्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके आणि शिवसेनेसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नेमक्या काय-काय घडामोडी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

आता पुढे काय होणार?

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून याआधीच उमेदवाराची घोषणा झाली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झालीय. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. पण राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात संभ्रमाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासाठी पक्षादेश सर्वश्रेष्ठ आहे. पक्षाने सांगितलं तर आपण पोटनिवडणुकीला उभं राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here