सोलापूर,दि.31: सोलापूर (Solapur) हिप्परगा येथे असलेल्या प्रसिध्द मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील 28 तोळे वजनाचा सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून भेट देऊन पाहणी केली. या मंदिरावरील कळस चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2022) काळात मध्यरात्री मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने भक्तगण संतप्त झाले आहेत. यापूर्वी देखील मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तळेहिप्परगा गावात मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांनी या मश्रूम गणपती स्थापन केला होता. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या योगदानातून गणपतीच्या मंदिरावर हा कळस बसवण्यात आला होता. 25 किलो वजनाच्या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे.
मश्रूम गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनराव पतंगे काल (31 ऑगस्ट) पहाटे मंदिरात आल्यावर त्यांना कळस चोरीला गेल्याचं समजलं. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊ पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संजय पतंगे हे मश्रूम मंदिराचे पुजारी असून ते देखरेख देखील करतात. 30 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे मंदिर बंद करुन ते घरी गेले. पण 31 ऑगस्टच्या मध्यरात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी श्री मश्रूम गणपती मंदिरावरील स्थापित असलेला अंदाजे 25 किलो वजनाचा पंचधातूचा कळस चोरीला गेला. या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. या कळसाची अंदाजे किंमत 14 लाख रुपये आहे.
याआधी 2016 मध्ये मुसळधार पाऊस सुरु असतानाच आणि वीज पुरवरठा खंडित झालेला असतानाच या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. त्यावेळीही मोठी खळबळ सोलापूर जिल्ह्यात माजली होती. मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने आरोपींना तातडीने अटक करुन कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे. मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसऱ्यांदा कळस चोरीला गेल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांनी 800 वर्षांपूर्वी सोलापूर-तुळजापूर मार्गावर मश्रुम गणपतीची स्थापना केली होती. भाविकांनी या मंदिराचा कायापालट करत मश्रुम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिरावर सोन्याचा कळस बसविला होता. मश्रुम गणपती मंदिराला दर्शन घेण्यासाठी कर्नाटक सह महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात.