एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.1: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. वारंवार आवाहन करूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेले आमदार परत आले नाहीत.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!”, असं ट्विट उद्धव ठाकरेंनी केलं.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here