मुंबई,दि.24: Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांनी फोन केला आणि शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. सध्या एकनाथ शिंदे चर्चेत आहेत ते राज्यातील राजकीय घडामोडीमुळे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे ठाणे ,कल्याण डोंबिवलीसह इतर जिल्ह्यातील इतर शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. एकीकडे शिंदे यांच्याविरोधात काही शिवसैनिक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र ठाणे जिल्हा मात्र शांत होता. शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. याला कारणही तसं भावनिक आहे.
”हॅलो डॉक्टर..मी एकनाथ शिंदे बोलतोय.. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे.त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा… माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विंनती…”, हे संभाषण होतं एकनाथ शिंदे यांचं! शिंदे यांनी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात फोन लावला होता. कारण ज्येष्ठ शिवसैनिक तथा डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ जूनला अचानक तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. मग क्षणाचाही विलंब न करता गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता थेट रुग्णालयातील डॉक्टरांना फोन लावला.
“आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या”, असं शिंदे म्हणाले. एकीकडे मोठया प्रमाणावर राजकीय उलथापालथ सुरू असतानाचा शिंदे यांनी फोन करून कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी केल्याने शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतं होतं.