देहू कार्यक्रम मंत्री छगन भुजबळ यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

0

मुंबई,दि.१५: मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) कौतुक केले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मारुतीबुवा कुऱ्हेकर, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले या वेळी उपस्थित होते.

मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली.

देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यावेळेस त्यांनी मोदींनी अजित पवारांना भाषण करण्यास सांगितल्याबद्दल कौतुकही केलंय.

सुत्रसंचालकाने थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे हात करत तुम्ही बोला असं सांगितलं. मात्र अजित पवार यांनी आपण बोलावं अशी भूमिका घेत मोदींकडे पाहून भाषणासाठीच्या पोडियमकडे हात केला. आता याच संदर्भात भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

“देहू येथील कार्यक्रमाला राज्याच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते यांना बोलायला संधी देता आणि राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री यांचे बोलण्याच्या यादीत नाव नाही हे चुकीचेच आहे,” असं भुजबळ म्हणालेत. तसेच पुढे बोलताना भुजबळ यांनी मोदींनी अजित पवारांना भाषणासाठी विचारल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. “पंतप्रधानांनी अजित पवारांना विचारले तो त्यांचा मोठेपणा आहे. मात्र अजित पवार यांना माहीत होते की, यादीत आपलं नावच नाही तर ते बोलतील कसे?,” असा उलट प्रश्न छगन भुजबळांनी या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here