प्रयागराज,दि.12:Prayagraj Bulldozer Actionउत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने (Yogi Government) कडक कारवाई केली आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाने (PDA) शहरातील दगडफेकीचा मुख्य सूत्रधार जावेद अहमद उर्फ जावेद पंप याचे करेली येथील घर पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध शुक्रवारी नमाजनंतर केलेल्या निदर्शनात दगडफेक करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी कारवाई सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 95 ज्ञात आणि 5000 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सरचिटणीस जावेद अहमद उर्फ जावेद पंपला हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. येथे हिंसाचारानंतर पोलिसांच्या कारवाईबरोबरच प्रयागराज विकास प्राधिकरणाने (पीडीएस) रविवारी त्यांच्यावर कारवाई केली आहे. (Prayagraj Bulldozer Action) त्यांचे आलिशान घर पीडीएसने पाडले आहे. बेकायदा बांधकाम केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईपूर्वी जावेदच्या घराबाहेर पीडीएसच्या वतीने नोटीस चिकटवण्यात आली होती.
प्रयागराज विकास प्राधिकरणाने चिकटवलेल्या नोटीसमध्ये विकास प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता तळमजला आणि पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आल्याचे म्हटले आहे. यासाठी तुम्हाला 1973 च्या कलम 27 (1) अन्वये कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून सुनावणीची तारीख 24 मे ठेवण्यात आली होती. मात्र या दरम्यान तुम्ही स्वतः किंवा तुमच्या बाजूचे कोणीही सुनावणीच्या तारखेला आले नाही. त्यामुळे 25 मे रोजी बांधकाम पाडण्याचे आदेश काढण्यात आले.
पीडीएसच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “या संदर्भात, तुम्हाला नोटीस जारी करण्यात आली होती आणि तुम्ही स्वतः 9 जूनपर्यंत अवैध बांधकाम पाडावे अशी सूचना तुम्हाला देण्यात आली होती. परंतु तुम्ही ते काम केले नाही. त्यामुळे 12 जून रोजी सकाळी 11:00 वा. पर्यंत ती जागा रिकामी करावी, त्यानंतर ते पाडण्याची कारवाई करता येईल.