सोलापूर,दि.५: सोलापूर-तुळजापूर महामार्गावर उळे व तामलवाडी यांच्या दरम्यान कासेगाव हद्दीत भरधाव मालवाहू ट्रकची जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात ५ म्हशींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सदगुरू पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक पलटी झाला. अपघात स्थळी पलटी झालेला मालट्रक आणि रस्त्यावरच पडलेले मुक्या प्राण्यांचे मृतदेह हे विदारक चित्र मन हेलावून टाकणारे होते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तुळजापूरकडून सोलापूरकडे येत असलेल्या भरधाव ट्रकची म्हशींच्या दलाला धडक लागली. त्यात ट्रकची धडक लागून जखमी झालेल्या ५ म्हशींनी तडफडून जागीच प्राण सोडला. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक पलटी झाला.
सोलापूरहून तुळजापूरकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रकच्या समोर अचानक म्हशी आल्याने ट्रक त्यांना धडकून रस्त्याखाली पलटी झाली. ट्रकच्या धडकेने कासेगाव येथील शेतकरी लखन वानकर यांच्या 5 गाभण म्हशी मृत पावल्या आहेत. यात वानकर यांचे सुमारे 6 लाखाचे नुकसान झाले आहे.
मालवाहतूक ट्रक व्हीआरएल लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीची आहे. घटना घडताच ड्रायव्हर गायब झाला आहे.
ही दुर्घटना कळताच आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेतली. त्या म्हशी कासेगाव येथील लखन वानकर या दुग्ध व्यवसायिकाच्या होत्या, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघात स्थळाचा पंचनामा झाल्यावरच नुकसानीचा संभाव्य आकडा पुढे येईल,असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.