मुंबई,दि.23: महाराष्ट्रातील 40 गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील 40 गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दिली होती. जत तालुक्यातील 40 गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते.
यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जत तालुका कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला आहे. 40 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या तालुक्याने महाराष्ट्र सरकार त्यांना पाणी देण्यास असमर्थ असल्याचा ठराव संमत केला. जत तालुक्यातील 40 गावांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याने कर्नाटकात सामील व्हायचे आहे, असे बोम्मई म्हणाले होते.
2012 ला कर्नाटकात जत तालुक्यात ही गाव यावीत ही मागणी होती. जत तालुक्यातील पाण्यासाठी राज्य सरकारचे काम सुरू आहे. सामोपचाराने हा विषय सोडवला पाहिजे, यासाठी आम्ही बैठका घेतल्या आहेत. जत तालुक्यातील लोकांसाठी आम्ही योजनेत सुधारणा केल्या आहेत. महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जत तालुक्यातील कोणतीही गाव पाण्यासाठी बाहेर जाणार नाहीत, याची काळजी सरकार घेईल. या प्रकरणाचा जुना वाद न्यायालयात आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.