अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 दोषींना फाशीची शिक्षा

0

अहमदाबाद,दि.18: अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्बल 21 ठिकाणी 26 जुलै 2008 रोजी बॉम्बस्फोट (Ahmedabad Serial Blast Case) घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात (Ahmedabad Serial Blast Case) विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात एकूण 49 दोषी होते त्यापैकी 38 जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

विशेष न्यायालयाने 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचवेळी सर्व 49 दोषींना UAPA अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने 49 जणांनाच दोषी ठरवलं होतं तर 28 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. या दोषींच्या शिक्षेच्या कालावधीबाबत सोमवारी सरकारी विकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर आज न्यायालयाने 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

ही साखळी बॉम्बस्फोटाची घटना 26 जुलै 2008 रोजी घडली होती. यादिवशी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्बल 21 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटानं संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात 56 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये 20 तर सुरतमध्ये 15 गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे मर्ज करून एकत्रित खटला भरवण्यात आला होता.

यानंतर 28 जुलै रोजी गुजरात पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. या पोलीस पथकानं अवघ्या 19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या याच दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 जुलैला सूरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे स्फोट होऊ शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 77 जणांना अटक केली होती. यातील 49 जणांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यापैकी 38 जणांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here