सोलापूर,दि.१: कोरोनाच्या (Corona) नव्या धोकादायक विषाणुला (Omicron) रोखण्यासाठी आवश्यक असलेले खबरदारीचे उपाय योजत सोलापूर शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आजपासुन सुरु होत आहेत. आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग यापुर्वीच सुरु करण्यात आले आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शाळा सुरु करण्याचे आदेश जारी केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या शिक्षकांनाच उद्या शाळेत प्रवेश देण्याची सुचना या आदेशात केली आहे. ज्या शिक्षकांनी लस घेतलेली नसेल त्यांना ४८ तासापुर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल देणे बंधनकारक आहे. पटसंख्येनुसार शाळा एक किंवा दोन सत्रात भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्याची अट घालण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी पत्रकारांना दिली.
शहरातील ३५६ शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, संपूर्ण शालेय परिसर निर्जंतुकीकरण करून घेणे. शाळेत उपस्थित राहण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी संमतीपत्र जमा करून घेणे, शाळेतील प्रत्येक वर्गाचे वेळापत्रक वेगवेगळे करणे, वेळापत्रकात मधली सुट्टी ठेवू नये, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघाची बैठक घेऊन कोविडविषयीची माहिती द्यावी, शाळेसमोरील खुल्या जागेत दोन मीटर अंतरावर वर्तुळ, चौकोन आखणे, शाळास्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती व हेल्थ क्लब स्थापन करणे, शाळेमध्ये सॅनिटायझर, थर्मलगन, ऑक्सीमीटर ठेवणे, हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावणे, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी या सर्वांनी शाळेच्या वेळेत पूर्ण वेळ मास्कचा वापर करावा, शाळेत तसेच शाळेच्या परिसरात वावरताना नेहमीच किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवुन वावरावे अशा सुचनांचा समावेश आहे.
विद्यार्थी बाधित झाला तर…
राज्य शासनाचा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार शाळा सुरु करीत आहोत. तीनवेळा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली आहे. त्यांना खबरदारीच्या सर्व उपाययोजना सांगीतल्या आहेत. भविष्यात शाळेमध्ये एखादा विद्यार्थी कोविडबाधीत आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवुन विलगीकरणात ठेवावे. त्याच्या संपर्कातील विद्यार्थ्यांची व शिक्षकांनाचही दोन आठवड्याकरता घरी विलगीकरण करावे. वर्ग सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करुन घ्यावा. असे विद्यार्थी किंवा शिक्षक विलगीकरणात असले तरी त्यांच्या आँनलाइन शिक्षणाची व्यवस्था करावी. शाळेत कोणालाही कोविड लक्षणे आढळली तर शाळेत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
कादर शेख, प्रशासनाधिकारी