दि.१७: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे २६७ लोकांनी चक्क आपल्याच राहत्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे. घर हे अनेकांसाठी सर्व काही असते. राहत्या घरावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून अनेकजण प्रयत्न करतात. पण आपले राहते घर पाडण्यात यावे अशी मागणी कुणी केलेली कधी ऐकली किंवा पाहिली नसेल. घर आपल्या आयुष्यभराची कमाई असते. आपलं घर वाचवण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. पण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये २६७ लोक चक्क आपल्याच राहत्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी करत आहेत. कानपूर विकास प्राधिकरणानं बांधलेल्या रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील सर्व २६७ रहिवाशांनी संपूर्ण सोसायटीमध्ये हे बॅनर लावले आहेत.
केडीएच्या भ्रष्टाचारामुळे रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील रहिवाशांसाठी मृत्यूचं ठिकाण बनलं असल्याचा आरोप केला जात आहे. अवघ्या तीन वर्षात या इमारतीच्या मुख्य बीमला तडे गेले आहेत. तर इमारतीच्या प्रत्येक भींतीतून गळती होत आहे. कानपूर विकास प्राधिकरणाने (KDA) तीन वर्षांपूर्वी कानपूरच्या किडवाई नगर ओ ब्लॉकमध्ये केडीए रेसिडेन्सी अपार्टमेंट बांधले होते. या अपार्टमेंटमध्ये बांधण्यात आलेले सर्व 267 फ्लॅट लोकांना वाटप करण्यात आले असून लोक त्यामध्ये राहू लागले आहेत. अपार्टमेंटच्या भिंतींमध्ये सुरुवातीपासूनच ओलसरपणा असल्याचं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. यासंदर्भात अनेकवेळा रहिवाशांनी केडीएकडे तक्रारही केली, मात्र कोणीही ऐकलं नाही. उलट आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की इमारतीच्या मुख्य बीमला मोठी तडा गेली आहे.
इमारतीच्या भिंतीतून चक्क पाण्याचे फवारे बाहेर पडू लागले आहेत. भिंतीवरून पाणी वाहत आहे. इमारत कधीही कोसळण्याची भीती रहिवाशांना आहे. शेडको रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष
इमारतीच्या दुरावस्थेबाबत अनेकवेळा केडीएच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, मात्र सुनावणीच्या नावाखाली केवळ आश्वासन देण्यात आलं, असं अपार्टमेंटमधील रहिवाशांचं म्हणणं आहे. आतापर्यंत एकही अधिकारी पाहणीसाठी आलेला नाही. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे व्यथित झालेल्या रहिवाशांनी स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेच आता साकडं घातलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भ्रष्टाचारावर बुलडोझरची कारवाई करत आहेत, त्यामुळे या कारवाईअंतर्गत त्यांच्या अपार्टमेंटवरच बुलडोझर चालवावा, असं अनोख आंदोलन सोसायटीच्या रहिवाशांनी सुरू केलं आहे.
रेसिडेन्सी सोसायटीतील रहिवाशांनी सोसायटीच्या आत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. या बॅनरवर लिहिले आहे की, ‘योगी जी… आमचे अपार्टमेंट पाडा’ या बॅनरचे फोटो काढून लोक स्वतः मुख्यमंत्र्यांना टॅग करत सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.